चाकूर तालुक्यातील जानवळ येथे भीषण आग; ७ जनावरांचा मृत्यू, लाखोंचे नुकसान
📍 जानवळ (ता. चाकूर) अरुण उजेडकर
चाकूर तालुक्यातील जानवळ गावाजवळ नांदगाव रोड परिसरात आज दुपारी भीषण आग लागून एका शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. जानवळ येथील रहिवासी ज्ञानोबा नारायण भोजने यांच्या शेतातील गोठ्याला अचानक आग लागल्याने सात जनावरे जळून दगावली असून, लाखो रुपयांची हानी झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास भोजने यांच्या गोठ्याला अचानक आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीची तीव्रता मोठी असल्याने नियंत्रण मिळवणे कठीण झाले.
या आगीत गोठ्यातील तीन जर्सी गायी, दोन कारवाडी व दोन गोरे अशी एकूण सात जनावरे मृत्युमुखी पडली. तसेच गोठ्यात साठवून ठेवलेले सोयाबीनचे २१ कटे, विद्युत वायरिंग, जनावरांचा कडबा व शेतीसाठी लागणारी अवजारे पूर्णपणे जळून खाक झाली.
या दुर्घटनेमुळे संबंधित शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, भोजने कुटुंब पूर्णपणे शेतीवर अवलंबून असल्याने त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे.
दरम्यान, घटनेनंतर स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तात्काळ पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्याला लवकरात लवकर शासकीय मदत द्यावी, अशी मागणी केली आहे. तसेच राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडेही मदतीसाठी विनंती करण्यात आली आहे.
👉 या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अचानक लागलेल्या आगीमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्रशासनाने याची सखोल चौकशी करून मदत कार्य गतीने करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



Post a Comment
0 Comments