उदगीर (अरुण उजेडकर)
विविध मागण्यांसाठी २१ एप्रिलपासून बेमुदत संप — महसूल कर्मचाऱ्यांचा सक्रिय सहभाग; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर
सरकारी निमसरकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी दि. २१ एप्रिल २०२६ पासून बेमुदत संप पुकारण्यात आलेला आहे. या समन्वय समितीचा महसूल विभाग हा एक महत्त्वाचा घटक असल्याने महसूल विभागातील कर्मचारी देखील सदर संपामध्ये सक्रियपणे सहभागी झालेले आहेत.
सदर संपाच्या पार्श्वभूमीवर उपविभाग उदगीर तर्फे मा. उपविभागीय अधिकारी श्री. सुशांत शिंदे यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
समन्वय समितीच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत :
जुनी पेन्शन योजना तात्काळ लागू करण्यात यावी.
वाहन चालक व शिपाई भरतीवरील बंदी तात्काळ उठवण्यात यावी.
सर्व सरकारी कर्मचारी, निवृत्तीवेतनधारक तसेच कंत्राटी/रोजंदारी कर्मचाऱ्यांना शासकीय व मान्यताप्राप्त रुग्णालयांमध्ये कॅशलेस उपचार सुविधा उपलब्ध करून द्यावी.
सलग दहा वर्षे सेवा करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत समाविष्ट करण्यात यावे.
कर्तव्य बजावत असताना अधिकारी व कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्यांविरोधात कडक कारवाई करण्यासाठी अजामीनपात्र कायद्याची तरतूद करण्यात यावी.
यावेळी लातूर जिल्हा संघटक श्री. सुग्रीव बिरादार, उदगीर तालुका महसूल कर्मचारी संघटनेचे तालुका अध्यक्ष श्री. विजयकुमार हंदेश्वर, तालुका उपाध्यक्ष श्री. विशाल कदम, तालुका सचिव श्रीमती विद्या पवार यांच्यासह ओमप्रकाश मानकोसकर, छगनलाल भन्साळी, प्रशांत शिवाळे, राऊफ शेख, सतीश मोरे, रमेश पाटणकर, रघुनाथ पाटील, राजकुमार स्वामी, सचिन स्वामी, कविता भांजे, श्रीजीत डोके, उर्मिला तिडके, प्रीतम पाटील, सय्यद उमर आदी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समन्वय समितीने शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.


Post a Comment
0 Comments