Type Here to Get Search Results !

*मौखिक आरोग्याची जाणीव, निरोगी जीवनाची हमी*


 उदगीर  / अरुण उजेडकर                                                                                                 

राष्ट्रीय दंत चिकित्सक दिन विशेष

 डॉ. प्राजक्ता गायकवाड

सहाय्यक प्राध्यापक

बाल दंत चिकित्सा विभाग, 

माईर एमआयडीएसआर दंत महाविद्यालय व रुग्णालय, लातूर

 दरवर्षी ६ मार्च रोजी राष्ट्रीय दंत चिकित्सक दिन साजरा केला जातो. दात आणि मौखिक आरोग्याबाबत जनजागृती करणे तसेच समाजाच्या आरोग्यसेवेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या दंतचिकित्सकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे, हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. निरोगी दात हे केवळ सुंदर हास्यासाठीच नव्हे तर संपूर्ण शारीरिक आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत. दात आणि हिरड्यांचे आरोग्य बिघडल्यास त्याचा परिणाम शरीरातील इतर अवयवांवर ही होऊ शकतो. त्यामुळे “निरोगी दात म्हणजे निरोगी जीवन” हा संदेश समाजापर्यंत पोहोचवणे अत्यंत गरजेचे आहे.

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत अनेकजण दातांची योग्य काळजी घेत नाहीत. वेदना झाल्यावरच दंत चिकित्सकांकडे जाण्याची सवय अनेकांमध्ये दिसून येते. परंतु तज्ज्ञांच्या मते, दर सहा महिन्यांनी नियमित दंत तपासणी केल्यास दातांतील किड, हिरड्यांचे आजार किंवा इतर समस्या सुरुवातीच्या टप्प्यातच ओळखता येतात आणि मोठे उपचार टाळता येतात. दिवसातून किमान दोन वेळा योग्य पद्धतीने दात घासणे, फ्लोराईडयुक्त टूथपेस्टचा वापर करणे, गोड पदार्थांचे सेवन कमी करणे आणि संतुलित आहार घेणे या साध्या सवयी दात निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतात.

विशेषतः लहान मुलांमध्ये दातांची स्वच्छता आणि योग्य सवयी बालपणापासूनच रुजवणे आवश्यक आहे. दुधाचे दात तात्पुरते असले तरी ते मुलांच्या बोलण्याच्या, खाण्याच्या आणि चेहऱ्याच्या योग्य वाढीसाठी महत्त्वाचे असतात. मुलांना दिवसातून दोन वेळा ब्रश करण्याची सवय लावणे, जेवल्यानंतर चुळ भरण्याची सवय लावणे आणि नियमित तपासणीसाठी दंत चिकित्सकांकडे नेणे ही पालकांची जबाबदारी आहे. योग्य वेळी मार्गदर्शन मिळाल्यास मुलांचे भविष्यातील दंत आरोग्य अधिक चांगले राहू शकते.

दंत चिकित्सक केवळ दातदुखीवर उपचार करणारे डॉक्टर नसून ते किड प्रतिबंध, हिरड्यांचे विकार, दातांची मांडणी - सुधारणा, दंत सौंदर्य चिकित्सा आणि मौखिक कर्करोग निदान अशा विविध क्षेत्रांत सेवा देतात. आधुनिक तंत्रज्ञानामुळे उपचार अधिक सुरक्षित, अचूक आणि कमी वेदनादायक झाले आहेत. तरीही भीती किंवा गैरसमजुतीमुळे अनेकजण दंत चिकित्सकांकडे जाणे टाळतात. ही प्रवृत्ती बदलणे आवश्यक आहे.

तंबाखूचे सेवन हा मौखिक आरोग्यासाठी गंभीर धोका आहे. सिगारेट, बिडी, गुटखा किंवा पानमसाला यांसारख्या पदार्थांमुळे तोंडाचा कर्करोग, हिरड्यांचे आजार, दात पिवळे पडणे आणि श्वसनाचे विकार उद्भवू शकतात. त्यामुळे तंबाखूविरोधी जनजागृती करणे ही काळाची गरज आहे. युवकांमध्ये वाढणारे तंबाखूचे प्रमाण लक्षात घेता शाळा, महाविद्यालये आणि सामाजिक स्तरावर प्रबोधनपर उपक्रम राबवणे आवश्यक आहे.

ग्रामीण व दुर्गम भागात दंत सेवा पोहोचवणे हेही एक मोठे आव्हान आहे. मोफत दंत तपासणी शिबिरे, मोबाईल दंत चिकित्सा व्हॅन, टेलीडेंटिस्ट्री सेवा आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण या माध्यमातून दंत आरोग्य सेवा सर्वांपर्यंत पोहोचवता येऊ शकते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सवलतीच्या दरात उपचार उपलब्ध करून देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. 

दातांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी नियमित फॉलो-अप व्यवस्था आवश्यक आहे. उपचारानंतर डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे, पुढील भेटीची नोंद ठेवणे आणि दैनंदिन मौखीक स्वच्छता पाळणे या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नये. नियमित मौखीक आरोग्याची काळजी घेतल्यास दातांची किड, हिरड्यांचे आजार आणि मोठ्या शस्त्रक्रिया टाळता येतात.

राष्ट्रीय दंत चिकित्सक दिन हा केवळ एक औपचारिक दिवस नसून दंत आरोग्याबाबत जागरूक राहण्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे. आपल्या दैनंदिन जीवनात मौखीक स्वच्छतेच्या सवयी अंगीकारून आणि नियमित दंत तपासणी करून आपण निरोगी हास्य कायम राखु शकतो. चला, या दिनानिमित्त आपण सर्वांनी दातांची योग्य काळजी घेण्याचा आणि दंत चिकित्सकांच्या मार्गदर्शनाचे पालन करण्याचा निर्धार करूया. कारण स्वस्थ दात म्हणजेच निरोगी आरोग्य होय.


शब्दांकन : श्रीधर घुले 

जनसंपर्क अधिकारी

एमआयटी, लातूर

Post a Comment

0 Comments