Type Here to Get Search Results !

बसस्थानकातील गर्दीत दागिने चोरणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; एक महिला अटकेत, साथीदार फरार


 लातूर/ प्रतिनिधी 

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; एक महिला अटकेत, साथीदार फरार

लातूर, दि. ५ मार्च : जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत एका महिला आरोपीस अटक केली आहे. तिच्याकडून सुमारे ७८ हजार ९५१ रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.

लातूर जिल्ह्यातील मालमत्तेसंबंधी गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखालील पथक गस्त घालत असताना ४ मार्च रोजी रेणापूर नाका येथील नवीन बसस्थानक परिसरात दोन महिला संशयास्पद हालचाली करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने पंचांच्या उपस्थितीत सापळा रचून एका महिलेला ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान तिने आपले नाव पुनम जितू कांबळे (वय ३४, रा. गांधीनगर, उदगीर) असे सांगितले. महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या अंगझडतीत तिच्याकडून सोन्याचे मणी मंगळसूत्र व सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा मुद्देमाल आढळून आला.

पुढील चौकशीत आरोपीने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरी केल्याची कबुली दिली. तपासादरम्यान औसा पोलीस ठाण्यातील गु.र.नं. ६४/२०२६ तसेच अहमदपूर येथील चोरीच्या गुन्ह्यांशी संबंधित बाबी उघडकीस आल्या आहेत.

पोलिसांनी आरोपीकडून मिळालेला मुद्देमाल जप्त करून तिला पुढील कारवाईसाठी औसा पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे. या प्रकरणातील दुसरी आरोपी अनिता कांबळे ही फरार असून तिचा शोध सुरू आहे.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे तसेच महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने व अंजली गायकवाड यांनी केली.

दरम्यान, बसस्थानक परिसरात होणाऱ्या चोरीच्या घटनांपासून बचावासाठी प्रवाशांनी आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष दक्षता बाळगावी व संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments