Type Here to Get Search Results !

उदगीर किल्ल्यात मोफत नेत्र तपासणी, दंत तपासणी व रक्तदान शिबिर; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*




 *उदगीर किल्ल्यात मोफत नेत्र तपासणी, दंत तपासणी व रक्तदान शिबिर; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद* 


उदगीर प्रतिनिधी /श्री सद्गुरु उदागीर महाराज मठ संस्थान, समाधी किल्ला उदगीर येथे समाजोपयोगी उपक्रमांतर्गत मोफत नेत्र तपासणी, दंत तपासणी तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. श्री सद्गुरु उदागीर महाराज मठ संस्थान, उदयगिरी लॉयन्स नेत्र रुग्णालय उदगीर, मातोश्री ऑप्टिकल अँड नेत्र तपासणी केंद्र शाहू चौक उदगीर तसेच सूर्यवंश दंत दवाखाना यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम पार पडला.

या शिबिरामध्ये नेत्ररोग तज्ञ डॉ. सागर संमगे (उदयगिरी लॉयन्स नेत्र रुग्णालय, उदगीर) यांनी उपस्थित राहून नागरिकांची मोफत नेत्र तपासणी केली. तसेच दृष्टितज्ञ मोतीराम सूर्यभान चिखले (मातोश्री ऑप्टिकल अँड नेत्र तपासणी केंद्र, उदगीर) आणि सचिन निलंगकर यांनीही नेत्र तपासणी करून रुग्णांना योग्य मार्गदर्शन केले. तपासणी दरम्यान मोतीबिंदू आढळलेल्या रुग्णांना अल्पदरात शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

याचबरोबर सूर्यवंश दंत दवाखाना यांच्या वतीने डॉ. सुमित त्र्यंबक सूर्यवंशी यांनी मोफत दंत तपासणी शिबिराचे आयोजन करून नागरिकांची दातांची तपासणी केली. दातांचे आजार, हिरड्यांच्या समस्या तसेच दंत स्वच्छतेबाबत त्यांनी रुग्णांना मार्गदर्शन केले. या दंत तपासणी शिबिराचाही नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला.

दरम्यान नागप्पा अंबरखाने रक्तपेढी, उदगीर यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात अनेक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.

या शिबिराचे आयोजन जयेश गीर व गुरू सतीषगिरी महाराज यांच्या पुढाकाराने करण्यात आले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी किरण महाराज भारती, सोनू महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सेवेकरी संतोष रावकोळे, प्रकाश तानसेटे, विशाल वारकरे, बालाजी पवार, अमोल भवाळ, संजय हलकुडे, व्यंकट भुये, ओमकार श्रीनेवार, महेश सोनटक्के आणि राजू स्वामी यांनी विशेष परिश्रम घेतले.

या उपक्रमामुळे अनेक भाविक व नागरिकांना मोफत आरोग्य तपासणी, उपचाराबाबत मार्गदर्शन तसेच रक्तदानाचे महत्त्व समजावून देण्यात आले. समाजोपयोगी सेवाभावी कार्यामुळे या शिबिराचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments