Type Here to Get Search Results !

दिवाळीच्या पूर्वसंध्येला वीस लाखाचा टिप्पर जप्त, वाळू माफियाला अहमदपूर पोलिसाचा दणका


 अहमदपूर (प्रतिनिधी) अहमदपूर येथे अवैध वाळूचा साठा करून ती वाळू उदगीर, अहमदपूर, चाकूर, जळकोट तालुक्यातील गरजू लोकांना मन मानेल त्या भावाने विक्री करण्याचा घाट अवैध वाळू विक्रेते आणि त्यांचे आका असलेले वाळू माफिया करत असतात. या अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाळू माफीयाना अहमदपूर उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले यांच्या मार्गदर्शना खाली अहमदपूर पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. या मोठ्या कारवाई मध्ये विनापरवाना वाळूची चोरटी वाहतूक करणारा सुमारे वीस लाख रुपये किमतीचा हायवा टिप्पर जप्त करण्यात आला आहे. दोन आरोपींच्या विरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

 यासंदर्भात पोलीस सूत्राकडून हाती आलेली माहिती अशी की, अहमदपूर ते शिरूर ताजबंद रस्त्यावर जवळगा पाटी येथे पोलीस कर्मचारी किरण कुमार भिसे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शाहरुख मौलाली सय्यद (वय 28 वर्ष रा. बामाजीची वाडी उदगीर) हा पांढऱ्या निळ्या रंगाचा हायवा टिप्पर (क्रमांक एम एच 24 जे 9939) मधून शासनाचा कर बुडवून वाळूची अवैध वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आल्यावरून पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी या कारवाईमध्ये अंदाजे पाच ब्रास किमतीची अर्थात पंचवीस हजार रुपये अंदाजे किंमत असलेली अवैध वाळू आणि सदरील अवैध वाळू वाहतुकीसाठी वापरलेला हायवा त्याची अंदाजे किंमत 20 लाख रुपये होते. असा एकूण 20 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

टिप्पर चालक शाहरुख सय्यद आणि गाडी मालक संतोष शेळके (रा. कोकणगा) या दोघा विरुद्ध कलम 303 (2), 3 (5) भारतीय न्याय संहिता सहकलम 15 पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमदपूर उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले यांच्या आदेशाने गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास आनंद श्रीमंगल हे करत आहेत. अवैधरित्या गौण खनिज वाहतूक करणाऱ्यावर यापुढेही सतत कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे. 

अहमदपूर पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे वाळूमाफियामध्ये चांगलीच दहशत बसली आहे.

Post a Comment

0 Comments