लातूर/ प्रतिनिधी
लातूर (गातेगाव), दि. 24 मार्च 2026
लातूर ग्रामीण पोलिसांनी प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध वाहतुकीविरोधात धडक कारवाई करत एक आरोपी अटक केला असून, एकूण 1 लाख 8 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस स्टेशन गातेगाव येथे दाखल गुन्हा क्रमांक 43/2026 नुसार, दिनांक 23 मार्च 2026 रोजी रात्री 11.15 वाजण्याच्या सुमारास लातूर ते कळंब रोडवर मौजे तांदुळवाडी शिवारातील हॉटेल संजीवनी समोर ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी मनोज कोंडीराम सरवदे (वय 26, रा. काटगाव, ता. जि. लातूर) याला ताब्यात घेण्यात आले असून, ऐजाज तांबोळी (रा. लातूर) हा आरोपी फरार आहे.
पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून एस.एम. बाबा सुपर क्वॉलिटी नावाचा सुगंधित तंबाखू (20 पुडे, प्रत्येकी 400 रुपये, एकूण 8,000 रुपये) तसेच एमएच 24 एटी 3525 क्रमांकाचा ऑटो रिक्षा (अंदाजे किंमत 1 लाख रुपये) असा एकूण 1,08,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
तपासादरम्यान आरोपीने हा गुटखा लातूर शहरातील गंजगोलाई, शिवाजी रोड येथील तांबोळी ट्रेडर्स दुकानातून आणल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणी महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेल्या तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक व विक्री केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम 123, 274, 275, 223 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई लातूर ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या पथकातील शिवा पाटील, अमोल स्वामी, मदन मुळे तसेच गातेगाव पोलीस स्टेशनचे पोउपनि जाधव व पोलीस कॉन्स्टेबल गिरी यांच्या पथकाने केली.सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोउपनि जाधव करत असून, फरार आरोपीचा शोध सुरू आहे.
👉 प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांच्या विरोधातील कारवाईमुळे अवैध व्यापारावर आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Post a Comment
0 Comments