ग्रामीण पोलिसांची अजब तर्हा !!
फरार सांगणारा आरोपी आमदार सोबत फिरतो खरा !!
उदगीर (अरुण उजेडकर) उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये अनेक मजेशीर किस्से ऐकायला मिळत आहेत. निडेबन हद्दीतील एका गंभीर गुन्ह्यातील सहा आरोपीवर गुन्हा दाखल झाला. त्यापैकी फक्त एका आरोपीला अटक दाखवण्यात आले. मात्र इतर पाच आरोपी पोलिसांच्या रेकॉर्डवर फरार दाखवले गेले. मात्र पोलिसांच्या नाकावर टिच्चून ते शहरात आणि ग्रामीण भागात राजरोस फिरत आहेत. इतकेच नाही तर ज्या आमदार महोदयांना पोलिसांचा कॅनवा, फॉलो करतो त्या आमदारांच्या गाठीभेटी घेताना वेळोवेळी आरोपींना लोकांनी पाहिले आहे. गुंड प्रवृत्तीच्या आरोपींना जर राजाश्रय आणि पोलिस आश्रय मिळत असेल तर लोकशाही धोक्यात यायला फारसा वेळ लागणार नाही. अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांमुळे निवडणुकीच्या काळात निश्चितपणे राजकीय नेतेमंडळी आपल्या बाजूने लोकमत मिळवण्याचा प्रयत्न केल्याशिवाय राहणार नाही. पूर्वी निवडणुका आल्या की, अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना निवडणूक काळापर्यंत हद्दपार केले जात होते. मात्र ज्यांना कागदोपत्री फरार दाखवून, गावात आणि शहरात फिरायची मुभा ग्रामीण पोलिसांकडून मिळते त्यांच्यावर कारवाई कोण करणार? हा मोठा प्रश्न आहे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या गप्पा मारणारे जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे साहेब आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण साहेब यांनी तरी उदगीर ग्रामीण पोलिसांच्या या नंगानाच प्रकरणाकडे काळजीपूर्वक पहावे. पोलिसांच्या संदर्भामध्ये अनेक तक्रारी असताना देखील त्याची दखल न घेता आरोपींना मुभा दिल्या जात असतील तर गुन्हे निश्चितच वाढत जाणार आहे. सर्वसामान्य आणि सज्जन माणसांना जगणे कठीण होत चालले आहे. यासंदर्भात कायद्याचे कठोर पालन केले जावे आणि गुन्हेगारांना पाबंद केला जावा अशी मागणी गावातून होत आहे.

Post a Comment
0 Comments