उदगीर (प्रतिनिधी )
ग्राहकांचे अधिकार, त्यांच्या न्यायनिवाड्याच्या समस्या आणि वाढत्या महागाईमुळे नागरिकांवर आलेले आर्थिक संकट या सर्व पार्श्वभूमीवर ग्राहक संरक्षण चळवळीचे महत्व दिवसेंदिवस वाढत चालले आहे. अशा संवेदनशील काळात अखिल भारतीय ग्राहक पंचायत, लातूर जिल्ह्यातील संघटनात्मक बळकटीसाठी विवेकानंद वसंतराव वाडीकर यांची जिल्हा सहसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
ही नियुक्ती जिल्हाध्यक्ष दत्तात्रय गुरुनाथ मिरकले (पाटील) यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन जाहीर करण्यात आली. संस्था स्थापनेपासून ग्राहक हक्कांच्या संरक्षणासाठी कार्यरत असून नव्या पिढीत सजग नागरिक घडविण्याचे काम सातत्याने करत आहे.
ग्राहकांचे हक्क धोक्यात येत असल्याने संघटनात्मक लढ्याची गरज निर्माण झाली आहे.
वाढती महागाई, बाजारातील मनमानी दरवाढ, जीवनावश्यक वस्तूंची टंचाई, शिक्षण क्षेत्रातील देणगीप्रथा, शासकीय योजनांतील भ्रष्टाचार व गळती यामुळे सामान्य नागरिकांची परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. नागरिकांच्या पैशाचा, त्यांच्या हक्कांचा आणि त्यांच्या स्वातंत्र्याचा प्रश्न गंभीर झाला असल्याने ग्राहक पंचायतची भूमिका अत्यंत महत्वाची बनली आहे.
अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे उद्दिष्ट म्हणजे ग्राहकांचे हक्क जपणे,
गैरव्यवहारांविरोधात लढा उभारणे,
जनतेत लोकशिक्षण, लोकजागृती व संघटनशक्ती निर्माण करणे,शासन व प्रशासनाला जबाबदार ठेवणे.
या ध्येयधोरणानुसार कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांची आज तातडीची गरज आहे. विवेकानंद वाडीकर यांच्या कामाची दखल घेत संस्थेने त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.
संस्थेच्या विविध उपक्रमांमध्ये सातत्याने सहभागी होत ग्राहक जनजागृती, तक्रार निवेदन, ग्रामस्तरावरील अभियान, युवकांत जागृती निर्माण केलेली आहे. या कामाची दखल संस्थेने घेतली आहे. त्यांच्या कार्यनिष्ठा, सामाजिक बांधिलकी आणि सक्रिय संघटनात्मक भूमिकेच्या आधारे त्यांना ही महत्वाची जबाबदारी देण्यात आल्याचे जिल्हाध्यक्ष मिरकले यांनी सांगितले.
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की,
"आज जनतेच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणारे, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे कार्यकर्ते अत्यंत गरजेचे आहेत. वाडीकर यांच्या रूपाने जिल्ह्याला एक ऊर्जावान आणि जबाबदार कार्यकर्ता लाभत आहे. निर्भीड आणि निपक्षपाती पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला आहे. लोकांच्या हक्कासाठी लढा देणारे वृत्तपत्र ते चालवत आहेत. त्यांच्या माध्यमातून पंचायतचे काम आणखी प्रभावी होईल."
नियुक्तीनंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना विवेकानंद वाडीकर यांनी संस्थेच्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ग्राहकांची फसवणूक रोखणे, अधिकाधिक नागरिकांना कायदेशीर मार्गदर्शन करणे, महावितरण, बँका, शिक्षण संस्था, बाजार समित्या व शासकीय कार्यालयातील त्रुटी उघड करणे या क्षेत्रात कामाला नवा वेग देण्याचा माझा संकल्प असेल असे विचार व्यक्त केले आहेत.
निलंगा, औसा, लातूर परिसरातील कार्यकर्त्यांमध्ये या नियुक्तीचे स्वागत होत असून वाडीकर यांचे अभिनंदन करण्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
ग्राहक आंदोलनाला नवी दिशा देणारी नियुक्ती
अखिल भारतीय ग्राहक पंचायत ही देशभरात ग्राहक हक्कांचे सर्वात मोठे व्यासपीठ म्हणून ओळखली जाते. जिल्हा सहसचिवपद ही संघटनात्मक दृष्टीने महत्वाची जबाबदारी आहे. वाडीकर यांच्या नियुक्तीमुळे लातूर जिल्ह्यात ग्राहक संरक्षण आंदोलनाला नवी दिशा आणि बळकटी मिळेल, असा विश्वास सर्व स्तरातून व्यक्त केला जात आहे.

Post a Comment
0 Comments