Type Here to Get Search Results !

सर्वधर्मसमभाव व विकासाची दृष्टी असलेला पक्ष म्हणजे काँग्रेस - अनिल सोमवंशी


 सर्वधर्मसमभाव व विकासाची दृष्टी असलेला पक्ष म्हणजे काँग्रेस - अनिल सोमवंशी 


उदगीर (अरुण उजेडकर) सर्वधर्मसमभाव हा लाख मोलाचा आणि माणुसकीचा संदेश देणारा पक्ष म्हणून देश पातळीवर काँग्रेस पक्षाची ओळख आहे. सर्वसामान्य नागरिकांना सोबत घेऊन गोरगरिबांचे हित जपले पाहिजे, सर्वसामान्य माणसांना विकासाच्या प्रवाहात आणले पाहिजे. या दृष्टीने काँग्रेस पक्ष काम करतो आहे. सध्या उदगीर नगर परिषदेच्या निवडणुका चालू आहेत. या निवडणुकीमध्ये विकासाची दूरदृष्टी असलेल्या सामाजिक भावना जपणाऱ्या डॉ. अंजुम कादरी या अध्यक्षपदासाठी उमेदवार आहेत. काँग्रेस पक्षाने माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या मराठवाडा संयोजक पदी काम करण्याची संधी दिली. विभागीय पातळीवर काँग्रेसचे काम करत असताना या पक्षातील उदात्त ध्येयधोरण मी अभ्यासले आहे. गोरगरिबांच्या सेवेसाठीच काँग्रेस पक्षामधून काम करायचा निर्धार करून आपल्या समोर मी प्रभाग 10 मधून आलो आहे. माझ्यासोबत समशुद्दीन शेख हे अनुभवी आणि या भागामध्ये त्यांनी लोककल्याणाचे अनेक कामे केलेले उमेदवार आहेत. 

उदगीर नगर परिषदेच्या एकूण कामकाजाच्या दृष्टीने काँग्रेस पक्षाने अत्यंत दूरगामी विचार करून अंजुम कादरी यांना उमेदवारी दिली आहे. अंजुम कादरी यांनी सोळाव्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद भूषवले होते. उदगीरकरांना जणू समाजवादी विचारधारेची मेजवानीच त्यांनी दिली होती, अध्यक्षपदावरून त्यांनी मांडलेले विचार त्यावेळेस मी ऐकले आहेत. आणि त्यामुळे मी प्रभावित झालो आहे. एक तर काँग्रेस पक्षाची लोककल्याणकारी भूमिका आणि दुसऱ्या बाजूला उमेदवार असलेल्या अंजुम कादरी यांचीही तीच भूमिका, यामुळे मला विश्वास आहे की, उदगीर नगर परिषदेमध्ये काँग्रेस पक्षाला मोठ्या प्रमाणात बहुमत प्राप्त होईल. या मध्ये तिळमात्र शंका नाही.

आपल्या प्रभागात मोठ्या संख्येने गोरगरीब आणि मध्यमवर्गीय राहतात. त्यांच्या हितासाठी केवळ आणि केवळ काँग्रेस पक्षच विचार करू शकतो. असा विश्वासही अनिल सोमवंशी यांनी जनतेशी सुसंवाद साधताना व्यक्त केला आहे. 

प्रभागातील जनतेला आपली भूमिका समजावून सांगताना काँग्रेस पक्षाची विचारधारा देखील अनिल सोमवंशी यांनी जनतेला समजावून सांगितली. याप्रसंगी समशुद्दीन शेख हे देखील सोबत होते. 

काँग्रेस पक्षाच्या अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांनी याप्रसंगी जनसंवाद फेरीमध्ये सहभाग घेऊन लोकांना काँग्रेस पक्षाचे महत्त्व पटवून दिले. 

सर्वच राजकीय पक्ष आपापली शक्ती आजमावत असताना जनतेच्या हिताचा विचार करणारा पक्ष म्हणून काँग्रेसलाच प्राधान्य दिले जाईल, असा विश्वासही याप्रसंगी शमशुद्दीन शेख यांनी व्यक्त केला आहे. जातीभेद आणि धर्म भेद करून राजकारण करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी काँग्रेस पक्ष हा एकमेव पर्याय ठरणार आहे. असेही विचार याप्रसंगी त्यांनी व्यक्त केले.

प्रभाग 10 मधून काँग्रेस पक्षाला प्रचंड बहुमत मिळू शकेल असा विश्वास ही नागरिकांनी व्यक्त केला आहे. सत्ताधारी पक्ष मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार करून मतदान विकत घेण्याचा प्रयत्न करेल, मात्र स्वाभिमानी जनता त्याला बळी पडणार नाही अशी खात्री या प्रभागातील अनेक नागरिकांनी याप्रसंगी दोन्ही उमेदवारांना बोलून दाखवली.

Post a Comment

0 Comments