चव्हाट्यावर येतोय उदगीर ग्रामीणचा भोंगळ कारभार !!
दलित पॅंथर ने ही तक्रार देऊन सुरू केला एल्गार !!
उदगीर (प्रतिनिधी) उदगीर येथील ग्रामीण पोलीस स्टेशनच्या एकूण कामकाजाच्या संदर्भामध्ये आता लोकांच्या तक्रारीत भर पडत चालली आहे. यातच दलित पॅंथर चे नेते डॉ. स्वप्नील ढसाळ, डॉ. संगीता विष्णू ढसाळ यांच्या वतीने दलित पॅंथर महाराष्ट्र प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष नरेंद्र आर.तीवारी आणि पॅंथर गौतम दादा सोमवंशी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकाकडे उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील पोलीस अधिकाऱ्या कडून नागरिक व कार्यकर्त्यावर होणारा छळ, पैशाची मागणी तसेच पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करून मनमानी व पक्षपाती कारभार सुरू ठेवल्याबद्दल चौकशी करण्याची मागणी करणारे निवेदन सादर केले आहे. सदरील निवेदनामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत सर्वच बीट मध्ये फिर्यादींना छळण्यात येत असून तक्रार नोंदवण्यासाठी देखील पैशाची मागणी केली जात आहे. पोलिसांकडून मानवाधिकाराचे उघड उल्लंघन होत आहे. तसेच त्यांच्याच आशीर्वादाने अवैध धंद्यांना प्रोत्साहन मिळत आहे, विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांशी पक्षपाती व अन्याय कारक वर्तन करून त्यांना धक्काबुक्की केली जात आहे. अवहेलना व मानसिक त्रास दिला जात असल्याचाही आरोप सदरील निवेदनात करण्यात आला आहे. पोलीस अधिकारी हे पदाचा गैरवापर करून मनमानी करत आहेत. अधिकारी राजकारणाशी निगडित असल्यामुळे पक्षपाती कारभार सुरू ठेवला असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. काही पोलिस अधिकारी राजकीय आश्रयाखाली बेकायदेशीर कृती करत असून माझे कोणीच काही वाकडे करू शकत नाही. अशा पद्धतीने वागत आहेत. अगदी गंभीर स्वरूपाचे, खुनासारखे गुन्हे दाखल करण्यासाठी देखील पैशाची मागणी केली जात असल्याचे गंभीर आरोप फिर्यादीने केले आहेत. पैसे न दिल्यास गुन्हा नोंदवण्यासाठी दोन दोन दिवस फिर्यादीच्या नातेवाईकांना पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या मांडून बसावे लागत असल्याचे उदाहरण ताजेच आहे. या आणि अशा अनेक गोष्टी गांभीर्यपूर्वक विचार करून आगामी काळातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या पक्षपाती व भ्रष्ट कारभारामुळे विशिष्ट राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना अन्यायकारकपणे त्रास दिला जाण्याची दाट शक्यता असल्याने उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन साठी प्रभारी अधिकारी म्हणून कर्तबगार पोलीस अधिकाऱ्याला आणि उदगीर शहरातील राजकीय परिस्थितीशी देणे घेणे नसेल अशा अधिकाऱ्याला उदगीर येथे नियुक्त करावे. अशी आग्रही मागणी देखील सदरील निवेदनात करण्यात आली आहे. जर योग्य ती कारवाई नाही झाली तर पॅंथरच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशाराही सदरील निवेदनात देण्यात आला आहे.

Post a Comment
0 Comments