उदगीर शहर पोलिसांच्या कामगिरीने अनेकांची आनंदी होणार दिवाळी !!
हरवलेले, गहाळ झालेले 18 मोबाईल शोधून संबंधितांच्या केले हवाली !!
उदगीर प्रतिनिधी, उदगीर शहर पोलीस स्टेशन हद्दीतील अनेक व्यक्तींचे मोबाईल हरवले होते, प्रवासादरम्यान कुठेतरी गळून पडले होते, गहाळ झाले होते. अशा मोबाईल गेलेल्या लोकांनी पोलीस स्टेशन येथे रीतसर तक्रार केली होती. अशा स्वरूपातील तक्रारी येत होत्या, याची बारकाईने पाहणी करून, त्या सर्वांची नोंद घेऊन ज्येष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप गाडे यांनी आपल्या पोलीस स्टेशनचे कर्मचारी दीपक कचवे यांना यासंदर्भात मार्गदर्शन केले, तांत्रिकदृष्ट्या तपास करून शोध घेण्याच्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, उदगीर येथील उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन भातलवंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील 18 मोबाईलचा शोध घेण्यासाठी मार्गदर्शन करून सूचना केल्या होत्या. या 18 मोबाईलचा शोध लागल्यानंतर संबंधित मोबाईलच्या मालकांना माहिती कळवून ते मोबाईल त्यांच्या हवाली करण्यात आले आहेत. उदगीर शहर पोलीस स्टेशनच्या या लोककल्याणकारी भूमिकेमुळे मोबाईल धारकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
ऐन दिवाळीच्या पूर्वसंध्येला आपापले गहाळ झालेले, हरवलेले मोबाईल मिळाल्यामुळे त्या 18 मोबाईल धारकांच्या चेहऱ्यावर खुशी दिसून येत होती. त्या सर्व मोबाईल धारकांनी उदगीर शहर पोलिसांचे आभार व्यक्त केले आहेत.

Post a Comment
0 Comments